प्रास्तविक

गेली पाच वर्षे मी (सु. वि. रानडे) अमेरिकेत वास्तव्यास आहे. आता ग्रीन कार्ड मिळाल्याने माझे कायमचे वास्तव्य तेथेच राहणार आहे.
अमेरिकेत मी राहतो तेथील म्हणजे पश्चिम किना-यावरील कॅलिफोर्निया राज्यातील बे एरिया नाव असलेल्या पण सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखल्या जाणा-या छोटा प्रदेशाचे जगभरातील आयटी क्षेत्रातील युवकांना आणि तरूण व्यवसाय उद्योजकांना जबरदस्त आकर्षण आहे. तेथे जाऊन नोकरी वा उद्योग उभा करण्याचे ते स्वप्न पहात असतात. ऐतिहासिक काळात, कॅलिफोर्नियामध्ये नदीच्या पाण्यात सोने मिळत असे आणि सोन्याच्या शोधात जगातील अनेक लोक स्थलांतर करून आले होते. तो गोल्ड रश कालावधी संपला आहे.

पण आता, हा प्रदेश माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्युच्च पदावर पोचल्याने कॉम्प्युटर चिपमधील सिलिकॉन वरून सिलिकॉन व्हॅली या नावाने प्रसिद्धीस आला असून याचे महत्व सोन्यापेक्षाही अनेक पटीने वाढले आहे.
तेथील पर्यावरण व समाजव्यवस्था यांचा थोडाफार अभ्यास केल्यावर मला असे आढळले की तेथे अनेक वर्षे राहणा-या विविध देशांतील लोकांना त्या प्रदेशाची अगदी त्रोटक माहिती आहे.

आपल्या मूळ प्रदेशातील लोकांशीच त्यांचा संपर्क आहे. तेथील स्थानिक लोकांची ओळख नसल्याने असुरक्षितता वाटते. स्थानिक लोकांनाही या उप-या लोकांविषयी संशय व असूया आहे. यावर एकमेव उपाय हा तेथे जाणा-या लोकांनी तेथील निसर्ग आणि समाज यांची माहिती तसेच तेथील समस्यांची सोडणवूक करण्यात आपले योगदान दिले पाहिजे. जन्मभूमीप्रमाणेच कर्मभूमीबद्दलही आपलेपणा वाटला. तरच ही दुराव्याची व असुरक्षिततेची भावना नाहिशी होईल.

या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फाऊंडेशनने मायसांगली आणि मायकोल्हापूर या लोकप्रिय वेबसाईटच्या धर्तीवर माय सिलिक़ॉन व्हॅली या नावाची वेबसाईट (www.mysiliconvalley.net) तयार करण्याचे काम हाती घेतले असून ती प्राथमिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आली आहे.

वेबसाईटच्या नावात “माय” म्हणून जो प्रत्यय जोडला आहे त्याला माझी हा एक विशेष अर्थ आहे. ज्याप्रमाणे स्थानिक रहिवाशांना आपल्या निवास स्थानाबद्दल किंवा क्षेत्राबद्दल अभिमान असतो. त्याप्रमाणे सिलीकॉनव्हॅलीमधील सर्व रहिवाशांना सिलिकॉन व्हॅलीविषयी आपलेपणाची व अभिमानाची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून वेबसाईटचे नाव निवडले आहे.

तेथे सध्या कार्यरत असणा-या बहुतेक वेबसाईट्स आयटी आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित आहेत. त्यांत व्यवसायांविषयी आणि उद्योग आस्थापनांबद्दल खूप माहिती आहे. काही साइट्स धार्मिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करणा-या आहेत व त्याही विशिष्ठ देशवासियांसाठी वा व्यवसायासाठी आहेत.
उद्देश – या वेबसाईटवर सहसा उपलब्ध नसणारी व बे एरिया म्हणून ओळखल्या जाणा-या प्रदेशाची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, तेथील निसर्गसंपदा, प्राणी व पक्षी, हवामान, वाहतुक तसेच प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांची माहिती संकलित करणे व तेथे असणा-या वा जाऊ इच्छिणा-या परदेशी व्यक्तींसाठी मार्गदर्शन करणे असा महत्वाकांक्षी उद्देश या वेबसाईट निर्मितीमागे आहे.

वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग
1. अमेरिका, कॅलिफोर्निया, बे एरिया आणि त्यातील सिलिकॉन व्हॅली यांचा इतिहास आणि भूगोल
2. भौगोलिक वैशिष्ट्ये, पाणी, माती, पर्यावरण आणि बदलते हवामान.
3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी
4. रस्ते व इमारती, वाहतूक व्यवस्था
5. कौंटी, शहरे आणि त्यांचे प्रशासन
6. पाणी पुरवठा, सांडपाणी विल्हेवाट, वीज
7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालय, शासकीय कार्यालये, मनोरंजन केंद्र, दुकाने आणि मॉल
8. स्थानिक आणि प्रादेशिक समस्या.
9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच
वरील मुद्द्यांबद्दल आम्ही काही मूलभूत माहिती संकलित केली आहे ती पुढील ब्लॉगमध्ये देणार आहे.परंतु प्रस्तावित वेबसाईटची व्याप्ती आणि उपयुक्ततेविषयी सूचना आणि माहिती यांचे स्वागत आहे.
आशा आहे की ही वेबसाइट ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फाऊंडेशन यांच्या प्रगती आणि सहकार्याचे नवीन दालन उघडेल. अर्थात यासाठी आपणा सर्वांचे सक्रीय साहाय्य मिळाल्यासच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकेल. याची आम्हाला जाणीव आहे.
आपण या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करावे ही विनंती.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *